भाविष्यातील हॉकी स्टार खेळाडू नवव्या राष्ट्रीय कनिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेत आपली ताकद पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही स्पर्धा भारतीय खेळ प्राधिकरणच्या मैदानावर रविवार (१७ फेब्रुवारी) पासुन खेळविण्यात येणार असून हि स्पर्धा पुलवामा हल्ल्यातील हुतातम्यांना समर्पित करण्यात आली आहे.
मराठवाडा आणि विदर्भ भागात पहिल्यांदाच होऊ घातलेली या स्पर्धेतुन चांगल्या व्यसपीठासह विविध स्पर्धांसाठी देशाची संघा स्थान मिळवता येणार आहे. पहिल्या दिवशी सात सामने खेळवण्यात येणार असुन त्यात गतविजेता हॉकी पंजाब संघ हा तामिळनाडूच्या हॉकी (दोन्ही संघ अ गट) संघाशी पहिल्या दिवशी, पहिल्यात सामन्यात भिडणार आहे.
पंजाब संघाकडे देशाच्या ज्युनीयर संघासाठी फॉरवर्ड खेळणारा प्रभज्योत सिंग आहे. मलेशियात गतवर्षी आठव्या सुल्तान ऑफ जोहर चषक स्पर्धेत भारतीय संघाने रौप्यपदक जिंकले होते. प्रभज्योतचा या भारतीय संघात समावेश होता. या व्यतीरीक्त भारतीय संघात खेळणारे संजय आणि मनिंदर सिंग (दोघे चंडीगड) या स्पर्धेत आपला खेळ दाखवणार आहेत. अर्जंटीना येथे २०१८साली झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी रौप्यपदक जिंकणाऱ्या संघात या दोघांचा समावेश होता.
याशिवाय हरियाणाचा सनी मलिक (१८ वर्षांखालील आशिया चषक, ढाका सुवर्णपदक विजेता), हरियाणाचा पवन मलिक ( अर्जंटीना येथील युवा ऑलिम्पिक २०१८), मणिपुरचा रबीचंद्र सिंग मोईरंगथाम (युवा ऑलिम्पिक) आणि इबूंगो कोंजेगबाम (१८ वर्षांखालील आशिया चषक, मलेशिया २०१५) यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, प्रशांत चौधरी, शिवनम् ए. (युवा ऑलिम्पिक), सौरभ आनंद (आशिया चषक), गोपी शंकर आणि विष्णुकांत (ज्युनीयर अझलन शहा चषक), विकास गौंड (एसजीएफआय इंडीया) या सहा स्टार खेळाडूंचा उत्तरप्रदेश संघात समावेश आहे. मध्यप्रदेश स्पोर्ट अकादमीच्या भात्यातही प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्याकडुन मोहंमद अलिशान (युवा ऑलिम्पिक आणि आशिया चषक), सौरभ पी (आशिया चषक) हे खेळाडू खेळतील तर राहुल कुमार राजभर, हा युथ ऑलिम्पिक चमूचा भाग असलेला खेळाडूही मध्यप्रदेशच्या भात्यात असणार आहे.
महाराष्ट्राला विजयाची अपेक्षा
यजमान महाराष्ट्र संघ २०१३ साली सोनीपत येथे झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिले होता. ही या संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा क गटात असलेल्या महाराष्ट्राच्या संघाची पहिली लढत ही रविवारी (१७ फेब्रुवारी) खेळवण्यात येणार आहे. आजित लाक्रा यांचे प्रशिक्षण आणि स्थानिक खेळाडू सत्यम निकमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाला अवघड प्रतिस्पर्धी असला तरी घरच्या मैदानावर यश मिळवण्याचा विश्वास महाराष्ट्र संघाला आहे.
साधा उदघाटन सोहळा
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर उद्धाटन सोहळ्यादरम्यान आयोजित सांस्कृतीक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या जवानांमध्ये नितीन राठोड (लोणार), संजय राजपूत (मलकापूर) या बुलढाणा जिल्ह्यातील जवानांचाही समावेश आहे.
रविवारचे सामने -
गट अ - हॉकी पंजाब विरुद्ध हॉकी तामिळनाडू (सकाळी ७ वा.),
हॉकी चंडीगड विरुद्ध सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) (सकाळी ८. ३० वा). गट ब - हॉरकी हरियाणा विरुद्ध मणिपुर हॉकी (सकाळी १० वा.), मध्यप्रदेश हॉकी विरुद्ध हॉकी झारखंड (सकाळी ११.३० वा.).
गट क - हॉकी गंगपुर - ओडीशा विरुद्ध दिल्ली हॉकी (दुपारी १ वा.)
गट ड - हॉकी ओडिशा विरुद्ध स्टील प्लांट स्पोर्टस बोर्ड (एसपीएसबी) (दुपारी २.३० वा.) गट क - उत्तरप्रदेश हॉकी विरुद्ध हॉकी महाराष्ट्र (दुपारी ४ वा.)